Ahilyanagar Crime: अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका सध्या गँगवॉरच्या दहशतीने हादरला असून, घोडेगाव परिसरात दोन गटांत झालेल्या रक्तरंजित संघर्षात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. जुन्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
घोडेगाव येथे वर्चस्वाच्या वादातून दोन गट समोरासमोर आले. बुधवारी रात्री अबरार शेख याच्यावर झालेल्या गोळीबाराने ठिणगी पडली होती, ज्याचा भयंकर स्फोट गुरुवारी झाला. दोन्ही बाजूंनी झालेल्या बेछुट गोळीबारात नितीन शिरसाठ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर सूरज फुलमाळी हा गंभीर जखमी झाला आहे. सूरजची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रुग्णालय परिसरातही थरार
धक्कादायक बाब म्हणजे, जखमींना उपचारासाठी नगरमधील खाजगी रुग्णालयात आणले असता, तिथेही दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांना भिडले. रुग्णालयाच्या आवारात मोठा राडा झाला, मात्र पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या तणावामुळे काही काळ रुग्णालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
प्रशासकीय कारवाई
पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत या प्रकरणातील दोन मुख्य संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेच्या तीव्रतेमुळे नेवासा तालुक्यातील बाजारपेठांमधील व्यवहार तातडीने बंद करण्यात आले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडला असून, परिस्थिती आता नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. भररस्त्यात झालेल्या या गोळीबाराने एखाद्या फिल्मी गँगवॉरची आठवण करून दिली असून, सलग दोन दिवस झालेल्या हिंसाचारामुळे नेवासा तालुक्यातील जनता दहशतीखाली आहे.


