Maharashtra Legislative Council : राज्यातील राजकारणात आता विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या निमित्ताने मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी उर्वरित ५ जागा लवकरच भरल्या जाण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या जागांवर वर्णी लावण्यासाठी सत्ताधारी गोटात हालचालींना वेग आला असून, लवकरच नावांची घोषणा होऊ शकते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ‘हिरोंना’ मिळणार प्राधान्य?
यावेळी निवडीमध्ये एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळू शकतो. ज्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यांना या ५ जागांवर प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत जमिनीवर काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी देऊन आगामी निवडणुकांचे समीकरण साधण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते.
विधान परिषदेचे सध्याचे ‘नंबर गेम’
विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ आहे, ज्याची सध्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
कार्यरत सदस्य: ५५
रिक्त जागा: २३
येत्या १३ मे २०२६ रोजी रिक्त होणाऱ्या जागा: ०९ (विधानसभा सदस्यांद्वारे निवडून आलेले)
निवृत्त होणारे प्रमुख चेहरे:
१३ मे रोजी उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे.
राज्यसभेचेही रणशिंग फुंकले
केवळ विधान परिषदच नाही, तर राज्यसभेच्या ७ जागांसाठीही एप्रिल २०२६ मध्ये निवडणूक होणार आहे. २ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्रातील खालील दिग्गज नेत्यांची मुदत संपत आहे:
- शरद पवार (राष्ट्रवादी – SP)
- रामदास आठवले (भाजप कोटा/RPI-A)
- प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना – UBT)
- भागवत कराड (भाजप)
- धैर्यशील पाटील (भाजप)
- रजनी पाटील (काँग्रेस)
- फौजीया खान (राष्ट्रवादी – SP)
राज्यात एका बाजूला राज्यपाल नियुक्त ५ जागांची भरती आणि दुसरीकडे मे महिन्यात रिक्त होणाऱ्या ९ जागा, यामुळे येत्या काही महिन्यांत राज्याच्या वरिष्ठ सभागृहात मोठी खांदेपालट पाहायला मिळणार आहे.


