Pune News : पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष मतदार नोंदणी (SIR) मोहिमेदरम्यान कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सात शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्तीचे आदेश असूनही कामकाजात टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी मोहिमेच्या पर्यवेक्षक मनीषा मातेरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार वारजे पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर परिसरातील विविध शाळांमधील सात शिक्षकांना मतदार नोंदणी मोहिमेसाठी बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यामध्ये महापालिकेच्या पाच शिक्षकांसह एका खासगी शाळेतील दोन शिक्षकांचा समावेश आहे.
मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल उदमले यांनी संबंधित शिक्षकांना लेखी आदेश देऊन कामकाजाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, आदेशानंतरही त्यांनी नियुक्त केलेल्या कामात अपेक्षित सहकार्य केले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी मोहिमेला महत्त्व असल्याने अशा प्रकारच्या दुर्लक्षाकडे गांभीर्याने पाहिले जात असून पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.


