Baramati Crime News : बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक किशोर मासाळ यांच्याविरोधात विनयभंगासह विविध गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पक्ष नेतृत्वानेही त्यांच्याकडून राजीनामा मागितल्याची चर्चा सुरू आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्यात ४५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून किशोर आप्पासाहेब मासाळ यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, फेब्रुवारी ते मे २०२६ या कालावधीत आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत महिलेच्या घरी अनधिकृत प्रवेश केला आणि वारंवार अश्लील स्वरूपाच्या मागण्या करत विनयभंगाचा प्रयत्न केला.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, आरोपीने आपल्या राजकीय ओळखीचा आणि प्रभावाचा वापर करून महिलेला धमकावले. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, महिलेचा पाठलाग करणे आणि मारहाण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर किशोर मासाळ यांनी सोशल मीडियाद्वारे दिलगिरी व्यक्त केली असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.


