पिंपरी-चिंचवड : राज्यात काही दिवसांत बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत असताना परीक्षेच्या तणावातून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील संत तुकाराम नगर परिसरात प्रणव सुनील खेरे (वय १७) या बारावीच्या विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन जीवन संपवलं. कुटुंबातील सर्व सदस्य घराबाहेर असताना प्रणव याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
प्रणव हा भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण संस्थेत विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. कॉलेजमधील प्रकल्प अपूर्ण राहणे आणि प्रात्यक्षिक परीक्षा न देता आल्याने तो मानसिक तणावाखाली होता. परीक्षेच्या दडपणामुळे तो नैराश्यात गेला असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्रणवच्या अचानक निधनामुळे खेरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


