बारामती : पवार कुटुंब एकत्र यावं, ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती, असं स्पष्ट वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, मात्र एक परिवार म्हणून सुनेत्रा काकींमध्येच आम्हाला अजितदादा दिसतात, असं भावनिक विधान त्यांनी केलं. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रोहित पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अजितदादांकडील सर्व खाती मिळावीत, ही आमची इच्छा होती. आता सुनेत्रा वहिनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, असंही त्यांनी सांगितलं. अजितदादांची कायमच इच्छा होती की, पवार कुटुंबातील सर्व सदस्य परिवार म्हणून एकत्र यावेत आणि त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
दुःखद घटनेनंतर गेल्या १३ दिवसांपासून संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आहे. कोणताही पूर्वनियोजन न करता आज काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे तिघेही एकत्र मतदानासाठी पोहोचले, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं. हेच अजितदादांचं स्वप्न होतं, असंही ते म्हणाले.
काल पवार साहेबांनी जय पवार आणि कुटुंबीयांना मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन भावनिक स्वरूपाचं होतं. दादांच्या स्मरणार्थ पुढील काळात काही गोष्टी करण्याबाबत चर्चा झाली. पवार साहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते सर्वांना बोलावून मार्गदर्शन करतात, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
प्रफुल पटेल-सुनील तटकरे प्रकरणावर मौन
प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवार यांनी बोलणं टाळलं. मात्र, १० फेब्रुवारीला अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत असलेल्या काही शंका उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच १२ फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत नेमकं काय ठरलं होतं, हे उघड करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सध्या कोणतीही राजकीय चर्चा नाही
अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये आतापर्यंत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. ९ तारखेनंतर आम्ही हळूहळू राजकीय विचार सुरू करू, असं रोहित पवार यांनी सांगितलं.


