Beed Crime: बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रंजेगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात असला, तरी गावात त्याच्या समर्थकांचा हैदोस अजूनही सुरूच आहे. गावातील एका अवैध जुगार अड्ड्याला धाडसाने विरोध दर्शवल्यामुळे एका दलित महिलेला गुंडांनी अत्यंत क्रूरपणे मारहाण केली आहे. याप्रकरणी मुख्य संशयित निखिल आबूज आणि त्याच्या इतर ४ ते ५ साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपी निखिल हा जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक असून, त्यांचे एकत्र असलेले अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आल्याने गावात तणावाचे वातावरण आहे.
लहान मुलांच्या भविष्याची काळजी अन् नराधमांचे सूडनाट्य
पीडित महिलेने गावातील जुगाराच्या अड्ड्यामुळे शाळकरी मुलांवर वाईट संस्कार होत असल्याचा आक्षेप घेतला होता. याचबरोबर, मुख्य आरोपी निखिल हा पीडितेच्या घरासमोरच वारंवार अश्लील चाळे आणि लघुशंका करून त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार करण्याची भूमिका घेताच, आरोपींचा जळफळाट झाला. सूड भावनेने पेटलेल्या या गुंडांनी महिलेच्या घरात घुसून तिला बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे, मारहाणीचे व्रण बाहेरून दिसू नयेत या अघोरी हेतूने नराधमांनी महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने सपासप फटके मारले. एवढ्यावरच हे गुंड थांबले नाहीत, तर त्यांनी महिलेचा बचाव करण्यासाठी आलेल्या तिच्या दोन निष्पाप चिमुकल्यांनाही उचलून जमिनीवर फेकून दिले. सुदैवाने या हल्ल्यात मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे.
गुन्हा नोंदवूनही आरोपी मोकाट असल्याने नागरिकांमध्ये संताप
या प्राणघातक आणि अमानुष हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दलित महिलेला तातडीने बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अमानवी अत्याचारामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप कोणालाही बेड्या ठोकण्यात आलेल्या नाहीत. गुंडांच्या या वाढत्या दहशतीमुळे रंजेगाव परिसरात भीतीचे सावट पसरले असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.


