Crime News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या भागात एक धक्कादायक सामूहिक हत्याकांड उघडकीस आले आहे. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात जमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भीमा नदी परिसर पुन्हा एकदा रक्तरंजीत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निराळे आणि गोलागी कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमीन वादातून हा हल्ला घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, याच बैठकीदरम्यान हल्लेखोरांनी धारदार शस्त्रे आणि गोळीबाराचा वापर करत भीषण हल्ला चढवला.
या हल्ल्यात रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर नदाफ यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. काही जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत झाली आहेत.
दरम्यान, भीमा नदीच्या काठावरील सीमाभागात जमिनीचे वाद, कौटुंबिक संघर्ष आणि जुन्या वैमनस्यातून यापूर्वीही अनेक खून झाले आहेत. गेल्या काही वर्षांत अशा घटनांमध्ये घट झाली होती. मात्र, या सामूहिक हत्याकांडामुळे पुन्हा एकदा भीमातीर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


