Rohini Paradhye : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील लोकप्रिय रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये हिने आत्महत्या केल्याच्या घटनेने सोशल मीडियासह संपूर्ण परिसर हादरला आहे. अवघ्या २५ वर्षांच्या रोहिणीने मंगळवारी दुपारी आपल्या ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेनंतर तिच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, नेमकं असं काय घडलं की रोहिणीने टोकाचं पाऊल उचललं, याबाबत चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे रोहिणी आणि तिचे पती निलेश पाराध्ये ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावाने व्यवसाय चालवत होते. सोशल मीडियावर हॉटेलमधील मजेशीर आणि खेळीमेळीच्या रील्समुळे दोघेही लोकप्रिय झाले होते. त्यांच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. वाढत्या लोकप्रियतेनंतर त्यांनी आणखी दोन शाखा सुरू केल्याची माहिती आहे.
मात्र, व्यवसाय वाढल्यानंतर व्यवस्थापन, आर्थिक ताण आणि शाखा सांभाळण्याच्या जबाबदाऱ्यांमुळे तणाव वाढल्याची चर्चा आहे. या कारणातूनच पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होत होते आणि त्यातून रोहिणीने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोमवारी हॉटेलची साप्ताहिक सुट्टी होती. त्यानंतर मंगळवारी हॉटेल सुरू न झाल्याने संशय निर्माण झाला. दुपारी एकच्या सुमारास रोहिणीने स्वयंपाकघरात गळफास घेतल्याचे समोर आले. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
रोहिणी आणि निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता. आंतरजातीय विवाहानंतर काही काळ ते पुण्यात राहत होते. तिथेच त्यांनी रील्स बनवण्यास सुरुवात केली होती. नंतर गावी परतल्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला आणि सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे त्यांचा व्यवसायही झपाट्याने वाढला.
दरम्यान, रोहिणीचा हा दुसरा विवाह असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे कौटुंबिक मतभेद, आर्थिक ताण किंवा अन्य काही कारण होतं का, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस आत्महत्येमागील नेमकं कारण शोधत आहेत.


