Chhagan Bhujbal Rajya Sabha : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांनी जाहीरपणे इच्छा व्यक्त केलेली नसली तरी पडद्यामागून त्यांच्या नावासाठी लॉबिंग सुरू आहे. एवढेच नव्हे तर, पुतणे समीर भुजबळ यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी ते आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
या चर्चेमुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, भुजबळ समर्थकांकडून यावर प्रत्युत्तर देण्यात येत आहे. “अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सुनेत्रा पवार खासदार झाल्या, सुनील तटकरे खासदार असताना त्यांच्या मुलीला मंत्रिमंडळात स्थान मिळालं. मग इतर नेत्यांच्या कुटुंबीयांना संधी दिली जाते, तर भुजबळ कुटुंबीयांबाबत वेगळा निकष का?” असा सवाल एका समर्थक नेत्याने उपस्थित केला आहे.
दरम्यान, छगन भुजबळ सध्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते गेल्या काही महिन्यांत चर्चेत होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला त्यांनी उघडपणे विरोध केला होता. ओबीसी समाजाची बाजू ठामपणे मांडणारे प्रमुख नेते म्हणून ते पुढे आले होते.
मात्र, त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पक्षाला राजकीय फटका बसत असल्याची नाराजी अजित पवार यांनी पक्ष बैठकीत व्यक्त केल्याची चर्चा होती. काही नेत्यांच्या टोकाच्या भूमिकेमुळे पक्षाची प्रतिमा प्रभावित होते आणि त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते, असे मत अजित पवार यांनी मांडल्याचे सांगितले जाते.


