Mahesh Mote : पुणे-पंढरपूर महामार्गावरील जेजुरी टोलनाक्यावर मराठी रीलस्टार आणि कंटेंट क्रिएटर महेश मोटे याने गोंधळ घालत टोल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. “मी रीलस्टार आहे, सामान्य माणूस नाही. माझी गाडी अडवायची नाही,” असे म्हणत त्याने कर्मचाऱ्यांवर दादागिरी केल्याचा दावा करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी येथील टोलनाक्यावर महेश मोटे याची कार कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणीसाठी अडवली होती. मात्र, यावेळी मोटेने स्वतःची ओळख सांगत टोल न भरण्याचा हट्ट धरला. आपण सोशल मीडियावरील मोठे स्टार असल्याचे सांगत त्याने कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
वाद वाढताच टोल कर्मचाऱ्यांनी अखेर त्याची गाडी टोल न घेताच सोडल्याचा दावाही करण्यात येत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून, “कायद्यापुढे सर्व समान आहेत” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर महेश मोटेचा जुना वादग्रस्त इतिहासही पुन्हा चर्चेत आला आहे. २०१७ मध्ये थायलंडमधील बँकॉक विमानतळावर सहप्रवाशाचे पैसे चोरल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला काही काळ तुरुंगवासही भोगावा लागल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर भारतात परतल्यानंतर त्याने सोशल मीडियावर रील्स बनवण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली.


