CNG Price Hike : महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगर प्रदेशात (MMR) सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG)च्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून, नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह लाखो घरगुती ग्राहकांचा खर्च वाढणार आहे.
नवीन दरांनुसार CNG चा दर प्रति किलो ८४ रुपयांवरून ८६ रुपये करण्यात आला आहे. तर घरगुती वापराच्या PNG चा दर ५१.५० रुपयांवरून ५२ रुपये प्रति युनिट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यातील ही CNG दरवाढीची दुसरी फेरी आहे. यापूर्वी १३ मे रोजीही प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली होती. एप्रिल महिन्यातही दरात वाढ झाली होती.
सततच्या दरवाढीमुळे ऑटो, टॅक्सी आणि बस चालकांवर आर्थिक ताण वाढणार आहे. त्यामुळे प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई रिक्षामेन्स युनियनने आधीच भाडेवाढीची मागणी केली असून, टॅक्सी संघटनांनीही किमान २ ते ३ रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव मांडला आहे.
दरम्यान, PNG दरवाढीचा फटका ३१ लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा खर्च वाढल्याने घरगुती बजेटवरही अतिरिक्त भार पडणार आहे.
गॅस वितरण कंपनीकडून जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, पुरवठा साखळीतील अडथळे आणि रुपयाच्या घसरणीमुळे गॅस खरेदी खर्च वाढल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळातही इंधन दरांवर दबाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


