इंदापूर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय (कळंब) येथे आयोजित ‘विश्वास’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या अटीतटीच्या स्पर्धेत संस्कार मंदिर महाविद्यालय (वारजे, पुणे) येथील रोहन ज्योतीराम कवडे याने प्रथम क्रमांक पटकावून मानाचे पारितोषिक मिळवले.
विजेत्यांचा गौरव आणि बक्षिसांचा वर्षाव
स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या रोहन कवडे यास १०,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तेजस दिनकर पाटील (७,००० रुपये) याने, तर तृतीय क्रमांक शिवाजी विधी महाविद्यालय (परभणी) येथील हनुमान सुभाषराव आहेर (५,००० रुपये) यांनी मिळवला. तसेच, माजी विद्यार्थी डॉ. नानासाहेब गोफणे यांच्या वतीने देण्यात येणारे उत्तेजनार्थ बक्षीस विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी मोहन रासकर हिला प्रदान करण्यात आले.
राज्यातून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, परभणी, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा यांसारख्या विविध जिल्ह्यांतील नामवंत महाविद्यालयांतून सुमारे २५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त शंकरराव रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
पारितोषिक वितरण समारंभास इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर आणि डॉ. नानासाहेब गोफणे उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. महादेव वाळुंज, डॉ. राहुल जगदाळे आणि डॉ. सीमा गोसावी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. विजय केसकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. तेजश्री हुंबे, प्रा. अभिजीत शिंगाडे व प्रा. विद्या गुळीग यांनी केले. शेवटी उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


