Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणूक 2026 साठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत एक महत्त्वाचं नाव समोर आलं आहे, नागपूरचे संजय भेंडे. पक्षासाठी अनेक वर्षं पडद्यामागून निवडणुका आखणारे आणि मायक्रो प्लॅनिंगमध्ये निपुण असलेले भेंडे आता पहिल्यांदाच स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
भाजपच्या संघटनात्मक कामात दीर्घकाळ सक्रिय असलेले संजय भेंडे हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “योग्य वेळी संधी दिली गेली. आजवरच्या अनुभवातून माझं राजकीय व्यक्तिमत्व घडलं,” अशी प्रतिक्रिया दिली.
जातीय राजकारणावर बोलताना भेंडे म्हणाले की, भाजप सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. “मी कुणबी समाजाचा असलो तरी पक्षात जात पाहून संधी दिली जात नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत संजय भेंडे?
- भाजपचे दीर्घकाळापासूनचे एकनिष्ठ कार्यकर्ते
- सध्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी
- नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांचे सलग तीन वेळा निवडणूक प्रमुख
- नागपूर महानगरपालिका निवडणुकीतही महत्त्वाची भूमिका
- सहकार क्षेत्रात सक्रिय; नागपूर नागरी सहकारी बँकेचे माजी संचालक
दरम्यान, भाजपने या निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगला विशेष महत्त्व दिलं आहे. प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखत उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ओबीसी, मराठा, अनुसूचित जाती आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी देत पक्षाने संतुलित समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी देताना वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात आल्याचंही या निवडीतून स्पष्ट होत आहे.


