Nashik Leopard Attack: दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. आई-वडिलांच्या डोळ्यादेखत एका बिबट्याने दोन वर्षांच्या चिमुरडीवर झडप घालून तिला फरपटत नेले. या भीषण हल्ल्यात ज्ञानेश्वरी मोरे या बालिकेचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
वलखेड परिसरातील बळवंत शिंदे यांच्या शेतात विलास मोरे हे कुटुंबियांसह मजुरी करतात. मंगळवारी रात्री मोरे दाम्पत्य आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह घराबाहेर बसलेले असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. काही कळण्याच्या आतच बिबट्याने ज्ञानेश्वरीला जबड्यात पकडले आणि अंधाराचा फायदा घेत शेतात पसार झाला. नागरिकांनी आरडाओरड करत पाठलाग केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
वनविभागाची कारवाई:
बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. वनक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शेतात तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे.
येवल्यात बिबट्याची दहशत; पाळीव जनावरांवर हल्ला
दुसरीकडे, येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथेही बिबट्याचा वावर वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी पहाटे निवृत्ती मढवई यांच्या कांद्याच्या शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याचे दर्शन होत आहे. वनविभागाने दोन ठिकाणी पिंजरे लावले असले तरी बिबट्या अद्याप चकवा देण्यात यशस्वी ठरत आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, या हिंस्र प्राण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


