Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ई-केवायसी (eKYC) प्रक्रियेची मुदत आता संपत आली असून, केवळ ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. ३० एप्रिल २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित महिलांना मिळणारे १५०० रुपये कायमचे बंद होऊ शकतात.
का वाढवली होती मुदत?
यापूर्वी केवायसीसाठी ३१ मार्च २०२६ ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांनी तांत्रिक चुका केल्यामुळे किंवा चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांचा लाभ थांबला होता. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या तांत्रिक अडचणींची दखल घेत महिलांना दुरुस्तीसाठी एक शेवटची संधी म्हणून ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती.
दुरुस्ती आणि पडताळणीची प्रक्रिया:
- ऑनलाइन पोर्टल: लाभार्थ्यांना योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या अर्जातील त्रुटी सुधारता येतील.
- व्हेरिफिकेशन: वेबसाईटवर आधार क्रमांक आणि ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी करणे अनिवार्य आहे.
- लाभ पुन्हा सुरू होणार: एकदा केवायसी यशस्वी झाली आणि वनविभागाकडून तिची पडताळणी झाली की, पात्र महिलांच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.
बोगस लाभार्थ्यांना चाप लावण्यासाठी ‘केवायसी’चे शस्त्र
केवळ गरजू आणि वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा फायदा मिळावा, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. मात्र, तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अनेक करदात्या महिला आणि सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, राज्यातील तब्बल १२,७५७ पुरुषांनी महिला असल्याचे भासवून सुमारे २२.९६ कोटी रुपये लाटले आहेत. श्रीमंत आणि अपात्र महिलांकडून ५० टक्के वसुली पूर्ण झाली असली तरी, या ‘घुसखोर’ भावांकडून पैसे परत घेण्याबाबत अद्याप ठोस नियोजन समोर आलेले नाही. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच सरकारने ई-केवायसी सक्तीची केली असून, खऱ्या पात्र भगिनींनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


