BJP Maharashtra : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज रात्री ‘वर्षा’ निवासस्थानी होणार असून, या बैठकीत विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा येण्याची शक्यता असून, त्या जागांसाठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संघटनेत काम केलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची शक्यता असून अंतिम यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जाणार आहे.
पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. उर्वरित पाच जागांसाठी जातीय आणि प्रादेशिक समतोल राखत उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.
दरम्यान, इच्छुकांकडून लॉबिंगला जोर आला असून अनेक नेत्यांनी मुंबईत गाठीभेटी सुरू केल्या आहेत. यामध्ये माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या नावांची चर्चा सुरू आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार 23 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार असून 30 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 मे रोजी छाननी, तर 4 मेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकीत 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. सध्याच्या संख्याबळाच्या आधारे महायुतीला 10 पैकी 9 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागू शकते.


