Maharashtra Weather : राज्यातील हवामानात मोठा बदल होत असून हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता आणि पावसाचा खेळ सुरू आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत असताना दुसरीकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल परभणी, अमरावती, हिंगोली, यवतमाळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली.
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा कायम असून बामणेवाडी आणि केशेगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. यामुळे काढून ठेवलेली ज्वारी आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून या भागात सतत पावसाची नोंद होत आहे.
सोलापूर शहर आणि परिसरातही गारांसह जोरदार पाऊस झाला. होडगी रोड, लष्कर आणि सात रस्ता भागात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. तसेच वाशीम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली असून चिखल आणि खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे.
दरम्यान, मालेगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले असून बाजारात कांद्याचे दर घसरल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. साठवणुकीतील कांदाही खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईत सकाळी ढगाळ वातावरण असले तरी दुपारी उकाडा जाणवत आहे. पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. एकूणच, राज्यभरातील बदलत्या हवामानामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


