Nashik Accident : नाशिकच्या सिडको परिसरातील खुटवडनगर येथील ‘सीटू’ भवन चौफुलीवर शनिवारी (१८ एप्रिल) दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. मद्यधुंद डंपरचालकाने नियंत्रण गमावल्याने एकामागून एक चार वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत २२ वर्षीय पायल गोसावी हिचा डंपरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर तिची बहीण आणि इतर आठ जण थोडक्यात बचावले.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवशक्तिनगरकडून खुटवडनगरकडे येणाऱ्या हायवाने प्रथम एका स्विफ्ट डिझायर कारला धडक दिली. कारमधील चार जण सुदैवाने बचावले, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या पायल गोसावी हिला जोरदार धडक दिली. या धडकेत ती डंपरच्या चाकाखाली अडकून जागीच ठार झाली, तर मागे बसलेली तिची बहीण दामिनी गोसावी बचावली.
याचदरम्यान चालकाने आणखी एका दुचाकी आणि चारचाकीलाही धडक दिली. पुढे डंपर औदुंबराच्या झाडावर आदळल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
या प्रकरणी डंपरचालक बाळू गंगाराम पागे (वय ७०, पंचवटी) याच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील दृश्ये अत्यंत हृदयद्रावक होती. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, पायलचा जीव वाचवता आला नाही.
पायल गोसावी ही महात्मानगर येथील एका खासगी कंपनीत लेखा विभागात कार्यरत होती. नुकतेच तिने एमबीए पूर्ण केले होते. घरात लग्नकार्य असल्याने ती सुट्टीवर होती आणि मेंदीसाठी नातेवाइकांकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. तिच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


