Shriniwas Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान, राजकीय वारसाहक्काच्या चर्चांना उधाण आले आहे. २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याचे संकेत आमदार रोहित पवार आणि जय पवार यांनी दिले. मात्र, आजच्या संवेदनशील प्रसंगी अशी विधाने करणे अनावश्यक असल्याचे सांगत अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी दोघांनाही सौम्य शब्दांत सुनावले आहे.
राजकारणापेक्षा प्रसंगाचे गांभीर्य महत्त्वाचे
श्रीनिवास पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक आहे. “आपण सर्वजण एकत्र येऊन दादांसाठी (अजित पवार) ही निवडणूक पार पाडत आहोत. कोणीही विरोधात उभे राहिलेले नाही. अशा वेळी २०२९ च्या निवडणुकीबद्दल भाष्य करण्याची दोघांनाही गरज नव्हती. अजून बराच मोठा प्रवास बाकी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
भाजपला दोष देण्यापूर्वी समजुतीने घ्या!
रोहित पवारांनी या संघर्षासाठी भाजपला जबाबदार धरले होते. त्यावर उत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले, “जर तुम्हाला माहिती आहे की पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीकरांना नको आहे, तर मग पवारांनी एकत्र बसून सामोपचाराने निर्णय घ्यायला हवा. कोणीतरी चुकीचे घडवून आणत आहे हे माहीत असूनही जर तुम्ही अशी विधाने करत असाल, तर भाजपला दोष देण्यात काय अर्थ?”
पवार साहेबांच्या संमतीशिवाय विधाने?
कुटुंबातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना श्रीनिवास पवार यांनी महत्त्वाचे विधान केले. गेल्या ६० वर्षांपासून राजकारणातील सर्व महत्त्वाचे निर्णय शरद पवार साहेबच घेत आले आहेत. रोहित आणि जय या दोघांनीही साहेबांना न विचारता ही विधाने केली आहेत. सध्या साहेबांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्यावर ते या दोघांशी नक्कीच बोलतील.
रोहित पवारांचे बारामतीतील वाढते दौरे
रोहित पवार बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत का? यावर श्रीनिवास पवार म्हणाले की, त्यांच्या मनात काय सुरू आहे हे काळच ठरवेल. मात्र, अलीकडच्या काळात रोहित पवारांचे बारामतीतील दौरे वाढले असून, साहेबांचा मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी घेण्याच्या उद्देशाने ते हे करत असावेत, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.


