Beed Crime News: ज्या घरात लग्नाच्या धावपळीचा आणि आनंदाचा उत्साह असायला हवा होता, तिथे आता शोककळा पसरली आहे. परळी येथे लोहमार्ग पोलीस (GRP) दलात कार्यरत असलेल्या एका 30 वर्षीय तरुण पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधीच गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन पंडित ढगे (वय 30, रा. लोहारा, जि. धाराशिव) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मूळचे धाराशिव जिल्ह्यातील असलेले नितीन ढगे परळी लोहमार्ग पोलीस दलात सेवा बजावत होते. लग्नासाठी 2 दिवसांची सुट्टी घेऊन ते गावी गेले होते आणि तिथून परतल्यानंतर पुन्हा कामावर रुजू झाले होते. मात्र, आज सकाळी माधवबाग येथील आपल्या भाड्याच्या घरात त्यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे, अवघ्या आठवडाभरात नितीन यांच्या लग्नाची तारीख होती. लग्नाची सर्व खरेदी आणि तयारी पूर्ण झालेली असतानाच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.
वरिष्ठांचा त्रास की अन्य काही? तपासाचे चक्र फिरले
नितीन ढगे यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची प्राथमिक चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही आत्महत्या आहे की त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले, या दोन्ही बाजूंनी पोलीस सध्या तपास करत आहेत.
परळी परिसरात दुसरी हृदयद्रावक घटना
परळी परिसरात तरुणांच्या आत्महत्येची ही काही दिवसांतील दुसरी मोठी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे (30) या तरुणाने सासरच्या जाचाला कंटाळून फेसबुक पोस्ट लिहीत आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ आता एका कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने लग्न ठरलेले असतानाच जीवन संपवल्यामुळे परिसरातून गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासन आता या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


