Nandurbar accident : नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार-धानोरा मार्गावर भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव वेगाने आलेल्या झायलो गाडीने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत रोहित आप्पा भिल आणि साजन भिल यांचा मृत्यू झाला.
रोहित भिल याचे अवघ्या काही दिवसांत लग्न होणार होते. घरात लग्नाची तयारी सुरू असताना तो आपल्या मित्र साजन भिलसोबत नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. मात्र लोय फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला भरधाव झायलो गाडीने धडक दिली. (Nandurbar accident)
अपघात इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले.
या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संबंधित झायलो गाडीला आग लावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. (Nandurbar accident)
या प्रकरणी पोलिसांनी झायलो चालक नाजील पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


