NEET Paper Leak Case News : देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी मोठी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये ‘GOD’ नावाने मोबाईलमध्ये सेव्ह असलेला विद्यार्थी तेजस शाह आणि लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांचा समावेश आहे. या प्रकरणातील ही बारावी आणि तेरावी अटक असून दोन्ही आरोपी महाराष्ट्रातील आहेत.
सीबीआयच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘GOD’ नावाने सेव्ह असलेला नंबर तेजस शाहचा असल्याचे उघड झाले. तपासादरम्यान तेजस शाहने मनीषा हवालदारकडून प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आल्यानंतर त्याला पुण्यातून अटक करण्यात आली.
दरम्यान, तेरावी अटक लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांची करण्यात आली आहे. जुना औसा रोड परिसरातील त्यांच्या सिद्धिविनायक बाल रुग्णालयात सीबीआयने छापा टाकून तब्बल साडेचार तास चौकशी केली. चौकशीदरम्यान मोबाईल, कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीत डॉ. शिरुरे हे मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. मागील काही वर्षांपासून ते या पेपरफुटीच्या नेटवर्कशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आहे.
काय होती पेपरफुटीची ‘मोडस ऑपरेंडी’?
सीबीआयच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार शिवराज मोटेगावकर होता. त्याने एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये आपल्या ओळखीच्या लोकांची नियुक्ती करून घेतली. त्यामध्ये पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांचा समावेश होता.
कुलकर्णी यांनी केमिस्ट्री तर मनीषा मांढरे यांनी बायोलॉजी विषयातील प्रश्न लक्षात ठेवून ते हस्तलिखित स्वरूपात बाहेर काढले. हे प्रश्न पुढे मोटेगावकरकडे पाठवले जात आणि त्याने त्यांचे PDF तयार करून पैशांच्या बदल्यात विक्री केल्याचा आरोप आहे.
तपासाची चाहूल लागताच मोबाईलमधील डेटा डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सीबीआयने डिजिटल डेटा रिकव्हर करत या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केल्याचे समोर आले आहे.


