Parbhani Crime: पूर्णा शहरातील ‘गुड मॉर्निंग रोड’ परिसरात आज पहाटे एका ५० वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवराव बैजाजी साखरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण पूर्णा शहरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, देवराव साखरे हे नेहमीप्रमाणे आज (शुक्रवारी) सकाळी व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते ‘गुड मॉर्निंग रोड’ परिसरात आले असता, दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्याने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोराने साखरे यांच्या पोटात शस्त्राने सपासप वार केले. हा वार इतका गंभीर होता की साखरे जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. सकाळी पावणे सातच्या सुमारास तिथून जाणाऱ्या इतर नागरिकांना साखरे गंभीर जखमी अवस्थेत दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
रुग्णालयाबाहेर उसळली गर्दी
नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साखरे यांना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हत्येची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच संतप्त आणि हळहळलेल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.
फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा, पोलिसांचा तपास सुरू
घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी ‘फॉरेन्सिक एक्सपर्ट’ (न्यायवैद्यक शास्त्र) टीमला पाचारण केले होते. या पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे गोळा केले आहेत. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाली की यामागे काही कौटुंबिक किंवा आर्थिक वाद आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्णा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची मदत घेत आहेत.


