Shikrapur Crime: ओळखीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे उघडकीस आली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
पोटदुखीमुळे समोर आले धक्कादायक वास्तव
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन अनिल पाटसकर (वय २७, रा. फुलगाव, ता. हवेली) याने पीडित मुलीशी मैत्री वाढवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. नुकतीच पीडित मुलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी कोरेगाव भीमा येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी केली तात्काळ कारवाई
या अनपेक्षित प्रकारानंतर कुटुंबीयांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग सांगितला. यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपी रोहन पाटसकर याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मस्कर करत आहेत.


