Maharashtra Politics : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील निवडणुकीआधी काँग्रेसचे तब्बल ६० ते ७० नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमार्फत होणाऱ्या या निवडणुकीत प्रत्येक नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्याचे मत महत्त्वाचे मानले जात असल्याने राजकीय पक्षांकडून जोरदार रणनीती आखली जात आहे. अशातच काँग्रेसमधील नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा रंगली असून, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढली आहे.
राजकीय वर्तुळात भाजपकडून नगरसेवकांना बाहेर हलवले जात असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका मतासाठी लाखोंची ऑफर दिली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
या प्रकरणामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा ऐरणीवर आली आहे. विशेषतः शिवानी वडेट्टीवार यांच्या संभाव्य उमेदवारीनंतर पक्षात नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी आणि सावली परिसरातील अनेक नगरसेवक संपर्काबाहेर असल्याने विजय वडेट्टीवार यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, भाजपवर होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप-महायुती सर्व १७ जागा जिंकेल असा दावा करत त्यांनी विरोधकांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. तसेच हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या घडामोडींमुळे राज्यातील विधान परिषद निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


