नवी दिल्ली : सध्या दिवाळीचा सण आहे. या सणासुदीच्या काळात सोने असो वा चांदीची खरेदी शुभ मानली जाते. सणासुदीचे दिवस असल्याने मागणी देखील वाढत आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. MCX वर सोने प्रति १० ग्रॅम १.३१ लाखांवर पोहोचले, तर चांदी प्रति किलो १.७० लाखांच्या जवळपास आहे.
सोने-चांदीच्या किमती गगनाला भिडत आहेत. असे असताना आता मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने सोन्याच्या खरेदीवर ऑफर लाँच केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने जिओ गोल्ड २४ के डेज ही योजना जाहीर केली आहे. जिओ फायनान्स किंवा मायजिओ अॅपद्वारे डिजिटल सोन्याच्या खरेदीवर बक्षिसे दिली जात आहेत. ही ऑफर १८ ते २३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वैध असणार आहे. असे असले तरी ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध असणार आहे.
या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना दुकानांमध्ये न जाता ऑनलाईन पद्धतीने शुद्ध सोने ऑनलाईन खरेदी करता येऊ शकते. या ऑफर कालावधीत २००० किंवा त्याहून अधिक किमतीचे डिजिटल सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २% अतिरिक्त सोने मोफत मिळेल, जे ७२ तासांच्या आत त्यांच्या गोल्ड वॉलेटमध्ये जमा केले जाईल.
याव्यतिरिक्त, २०००० किंवा त्याहून अधिक किमतीचे सोने खरेदी करणारे ग्राहक जिओ गोल्ड मेगा प्राईज ड्रॉसाठी आपोआप पात्र ठरतील, ज्यामध्ये एकूण १० लाखांची बक्षिसे समाविष्ट आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.


