क्रिकेटच्या पंढरीत असलेल्या वानखेडेच्या मैदानावर गुरुवारी स्टेडियममध्ये बुम..बुम..बुमरा…नावाचा जयघोष सुरु होता. हा नुसता जयघोष नव्हता, तर एका सर्वोत्तम खेळाडूबाबत क्रिकेट चाहत्यांना असलेला विश्वास आणि आदर याचे उदाहरण होते. क्रीडा क्षेत्रात आतापर्यंच बुम..बुम..हे विशेषम जर्मनीचा सर्वोत्तम टेनिसपटू बोरिस बेकरच्या सर्व्हिसबाबत बोलले जात होते. पण, आता हे विशेषण भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराबाबत वापरले जाते आणि त्यासाठी तो पात्र आहे. बुमरा हा असा गोलंदाज आहे की कोणत्याही कर्णधाराला तो आपल्या संघात असावा असे वाटते. बुमरा एक महाशक्ती आहे. असा गोलंदाज भारतीय संघात असणे हे भारतीय चाहत्यांचे भाग्य म्हणावे लागेल. त्याच्या हातात चेंडू आला की तो तुम्हाला विजय मिळवून देतो, हे क्रिकेटच्या तीनही पद्धतीत आजपर्यंत दिसून आले आहे.
अल्लाउद्दीनच्या गोष्टीतील जीनसारखा बुमरा भारतीय संघाच्या मदतीला धावून येतो. अल्लाउद्दीनच्या गोष्टीत दिवा असतो तो घासला की जीन बाहरे येतो आणि तो दिवा घासणाऱ्याचे संकट दूर करतो, त्याची स्वप्ने पूर्ण करतो. क्रिकेटमध्ये अल्लाउद्दीनची जागा भारतीय संघाचा कर्णधार घेतो. तो दिवा नाही, तर चेंडू घासतो आणि बुमराला गोलंदाजीसाठी बोलावतो. मग, बुमरा आपल्या चातुर्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांची पळता भुई थोडी करतो. जेकेब बेथेल फलंदाजी करत असताना इंग्लंडचा धावांचा पाठलाग सुकर होता. पण, कर्णधार सुर्यकुमार यादवने सोळावे आणि अठरावे षटक बुमराला दिले आणि या दोन षटकांत त्याने जी काही गोलंदाजी केली त्याला अपवाद नाही. त्याचे यॉर्कर धडकी भरवत होते. इंग्लंडला तेव्हा धावांच्या दृष्टिने मोठ्या षटकाची अपेक्षा होती. तेथे बुमराने त्यांना जखडून ठेवले. भारताच्या विजयात हीच दोन षटके निर्णायक ठरली यात शंकाच नाही.
एखादा अडकलेला रेसचा घोडा जसा दरवाजा उघडण्याची वाट पाहतो, तसा तो फलंदाज स्थिरावण्याची वाट पाहतो. खांद्यांची अनैच्छिक हालचाल थांबवून, तो एका सूक्ष्म क्षणासाठी स्वतःला सावरतो आणि चेंडू दोन्ही हातांनी डोक्यावर धरून वेगाने चालायला सुरुवात करतो. काही पावलांनंतर तो वेग पकडतो आणि बॉलिंग क्रीझपाशी येताच, उजवा कोपर पूर्ण ताणून आणि डावा गुडघा घट्ट रोखून चेंडू टाकतो.
त्याच्या हातातून सुटलेला चेंडू तेव्हा विनाशाचे शस्त्र बनलेला असतो. फलंदाजाला काहीच उमगता नाही. त्याचा चेंडू कधी हवेत सीम होतो, तर कधी खेळपट्टीवर पडल्यावर थेट यष्ट्यांवर आदळतो, तर कधी तो चेंडू आतल्या बाजूला येऊ शकतो. कधी तो चेंडू ऑफ-स्टंपच्या खूप बाहेर वाटतो पण, कधी थेट पायाच्याअंगठ्याचा किंवा यष्ट्यांचा वेध घेतो ते कळत नाही. क्रिकेट जगतातील त्याचा सामना केलेले फलंदाज हे सगळे मान्य करतात. क्रिकेटच्या चेंडूने जसप्रीत बुमरा काही करु शकणार नाही असे म्हणताच येणार नाही. समोर उजव्या हाताचा फलंदाज असो वा डाव्या हाताचा; चेंडू नवीन असो वा जुना; कसोटी क्रिकेट असो वा मर्यादित षटकांचे प्रकार. बुमराह त्याच्या पिढीतील सर्वात परिपूर्ण गोलंदाज आहे.जो अत्यंत वेगळा, कमालीचा कुशल आणि अविश्वसनीय आहे.
त्यामुळेच विशाल आणि आक्रमक फटकेबाज फलंदाजांची फौज भारतीय संघाकडे उपलब्ध असली, तरी विजेतेपदाची मोहिम पूर्ण करण्यासाठी बुमरा हवाच. त्याच्या चार नाही, तर केवळ एका षटकानेही फरक पडतो हे उपांत्य फेरीत दिसून आले. त्याचा प्रभाव इतका जबरद्त होता की त्याच्या शिल्लक षटकांच्या दबावामुळे अन्य गोलंदाजांना त्याचा फायदा झाला. हार्दिक पांड्याने बुमरानंतर टाकलेले षटक याचे उत्तम उदाहरण देता येईल. बुमराच्या गोलंदाजीची आकडेवारी म्हणजे केवळ तांत्रिक आकडे आहेत. ते जणू स्वतःचीच कहाणी सांगतात. हे आकडे बुमरा संघाच असल्याचा किती फायदा होतो किंवा आत्मविश्वास कसा वाढतो हे सांगू शकत नाही. बुमरा भारतीय संघात आहे म्हटले कीच प्रतिस्पर्धी फलंदाजांमध्ये धडकी भरते एवढेच त्याचा दरारा सिद्ध करण्यास पुरेसे आहे.


