Gopichand Padalkar : सांगली जिल्ह्यात सध्या राजकारण चांगलंच तापलं असून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्याबाबत खळबळजनक दावा करत, त्यांना तिकीट मिळणार नव्हतं आणि त्यामागे ठरवून राजकीय खेळी झाली असल्याचा आरोप केला आहे.
पडळकर यांनी थेट जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची नावं घेत, “दोघांना आधीच माहिती होती की काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे ठरवून त्यांचा गेम करण्यात आला,” असा गंभीर आरोप केला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर संबंधित नेत्यांना त्यांच्या सोबत राहावं लागलं, असा टोला देखील पडळकर यांनी लगावला.
याआधीही सांगलीतील बाजार समितींच्या त्रिभाजनाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद रंगला होता. या निर्णयामुळे महायुतीने महाविकास आघाडीला धक्का दिल्याची चर्चा होती. त्यानंतर जिल्हा बँकेच्या चौकशीसारख्या मुद्द्यांवरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.
आता पडळकर यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सांगलीतील राजकीय वातावरण तापलं असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


