उन्हाळ्यात असो वा इतर ऋतूत आपण पदार्थ ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर करत असतो. आजकाल प्रत्येक घरात फ्रीज पाहिला मिळतो. वेळ वाचवण्यासाठी, लोक शिजवलेले अन्न साठवतात किंवा उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवतात. फ्रिज अन्न दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतात. मात्र, हे पदार्थ कायमच ताजे राहतात असे नाही.
घरी बनवलेले शिजवलेले अन्न साधारणपणे फ्रिजमध्ये फक्त दोन ते तीन दिवस टिकते. त्यानंतर, जिवाणूंच्या वाढीचा धोका वाढतो. उकळलेले दूध देखील दोन ते तीन दिवसांच्या आत सेवन करणे उत्तम असते, तर पॅक केलेले दूध उघडल्यानंतर दोन दिवसांच्या आत सेवन केले पाहिजे. ताजे दही फ्रिजमध्ये चार ते पाच दिवस चांगले राहते, परंतु जर ते आंबट होऊ लागले किंवा त्याला विचित्र वास येऊ लागला, तर ते वापरू नये. हिरव्या पालेभाज्या रेफ्रिजरेटरमध्ये तीन ते चार दिवस टिकतात, तर गाजर, घेवडा आणि फुलकोबी यांसारख्या भाज्या पाच ते सात दिवस टिकू शकतात.
फळांमध्ये, सफरचंद आणि नाशपाती एक ते दोन आठवडे टिकतात. मात्र, द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी यांसारखी फळे तीन ते पाच दिवसांत खराब होऊ शकतात. कापलेली फळे रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ ठेवणे योग्य नाही. ती २४ तासांच्या आत खावीत, अन्यथा ती दूषित होऊ शकतात.
अंडी, मांस आणि ब्रेड साठवण्याची मर्यादा
कच्ची अंडी रेफ्रिजरेटरमध्ये सात ते दहा दिवस टिकतात, तर उकडलेली अंडी दोन ते तीन दिवसांच्या आत खावीत. कच्चे चिकन किंवा मांस एक ते दोन दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये आणि मासे २४ तासांपेक्षा जास्त काळ ठेवू नयेत. ब्रेड रेफ्रिजरेटरमध्ये ५ ते ७ दिवस साठवता येतो, परंतु जास्त काळ साठवल्यास त्याची चव आणि पोत खराब होऊ शकतो.


