Rain Alert : महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला असला तरी यंदा दिवाळीत पावसाचं विघ्न येण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या उष्णतेचा तडाखा कायम राहील.
मुंबईत उकाडा, पालघरात ढगाळ वातावरण
मुंबईत आज पाऊस अपेक्षित नाही, पण कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन दमट हवेमुळे उकाडा जाणवेल. ठाणे आणि नवी मुंबईतही कोरडं हवामान राहील. मात्र, पालघरमध्ये आकाश ढगाळ राहून हलक्या सरींची शक्यता आहे, तरीही मुसळधार पावसाचा धोका नाही.
पुढील 48 तास महत्त्वाचे
हवामान तज्ज्ञांनुसार, पुढील 48 तासांत हवामानात बदल होऊ शकतात. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, लक्षद्वीप ते पश्चिम बंगालकडे सरकणार आहे. यामुळे दक्षिण भारतात 7 दिवस मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रात थेट वादळाचा धोका नसला तरी कोकण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात 19 ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट कायम ठेवला असून, यंदा दिवाळी पावसात साजरी होण्याची चिन्हं आहेत.


