टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर भारताने उभे केलेले २५३ धावांचे आव्हान हे निश्चितच आव्हानात्मक होते. कितीही चांगली फलंदाजी केली तरी इतके मोठे आव्हान कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अभावानेच पार पडते. जेव्हा आव्हान पार पडते तेव्हा ते आश्चर्य असते आणि अशी आश्चर्य सारखी घडत नसतात. त्यामुळेच भारताने ठेवलेले २५४ धावांचे आव्हान विजयासाठी निश्चित पुरेसे होते. फक्त गोलंदाजी अचूक अपेक्षित होती. ते काम जसप्रित बुमरा आणि हार्दिक पांड्या यांनी चोख पार पाडले. पहिल्या उपांत्य फेरीसारखा हा सामना एकतर्फी झाला नाही. इंग्लंडकडून प्रामाणिक प्रयत्न झाले. या सामन्यात हॅरी ब्रूक आणि संपूर्ण स्पर्धेत जोस बटलरचे अपयश त्यांना चांगलेच सलत असेल. भारताने देशातील क्रिकेट पंढरीत आणखी एक सामना जिंकत सलग दुसऱ्या वर्षी टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
दुसऱ्या उपांत्य फेरीची ही आकर्षक नाट्याने भरलेली रात्र होती, ज्यामध्ये ४० षटकांत तब्बल ४९९ धावांचा पाऊस पडला आणि ३४ षटकार खेचले गेले. संजू सॅमसनने सलग दुसऱ्या सामन्यात खेळलेल्या निर्णायक खेळीमुळे आणि जसप्रीत बुमरा, हार्दिक पांड्याच्या अचूक व भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने रविवारी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, हे यश मिळवण्यासाठी भारताला जेकब बेथेलच्या विस्मयकारक खेळीचा सामना करावा लागला. बेथेलने अवघ्या ४८ चेंडूत १०५ धावा कुटून इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या, पण मुंबईत झालेला हा थरारक पाठलाग अखेर भारताने यशस्वीपणे रोखला हे मान्य करायलाच हवे. भले बटलर, ब्रूक खेळले नसतील, पण जेकब बेथेल या युवा फलंदाजांने प्रयत्नांची शिकस्त केली. भारतीय वेगवान गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये दाखवलेल्या संयमामुळे इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले. बुमराने टाकलेले १८वे आणि हार्दिक पांड्याने टाकलेले १९वे षटक निर्णायक ठरले. या दोन षटकांत इंग्लंडला धावा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे अखेरच्या षटकांतील आव्हान कठिण झाले आणि सामन्याचा निकाल स्पष्ट झाला.
सामन्याचे सर्व कोनातून विश्लेषण करायचे झाल्यास क्षेत्ररक्षण हा मोठा फरक दिसून आला. सामन्याच्या तिसऱ्याच षटकात हॅरी ब्रूकने सॅमसनचा (१५ धावांवर असताना) एक सोपा झेल सोडला, ज्यामुळे बिचारा गोलंदाज जोफ्रा आर्चर हताश झाला. याउलट, भारताच्या विजयात अक्षर पटेलने सीमारेषेवर केलेल्या दोन विस्मयकारक क्षेत्ररक्षणाचे योगदान मोलाचे ठरले. पहिली घटना डीप कव्हरमध्ये घडली, जिथे अक्षरने ब्रूकलाच झेलबाद करून क्षेत्ररक्षण कसे असावे याचा नमुना दाखवला आणि इंग्लंडच्या सर्वात संभाव्य मॅचविनरला अवघ्या ७ धावांवर माघारी धाडले. दुसरी घटना डीप बॅकवर्ड पॉइंटला घडली, जिथे त्याने धावत जाऊन विल जॅक्सचा अप्परकट रोखत एक अविश्वसनीय रिले कॅच घेतला. जॅक्स आणि बेथेल यांच्यातील ७७ धावांच्या पाचव्या विकेटच्या भागीदारीने अखेरच्या सहा षटकांपर्यंत इंग्लंडच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या.
इंग्लंडच्या आजच्या सामन्यातील नियोजनातच चुका होत्या. पहिली चूक त्यांनी रेहान अहमदला वगळून जेमी ओव्हर्टनला संधी दिली. एक उपयुक्त फिरकी गोलंदाज आणि तळाच्या फळीतील एक फलंदाज म्हणून इंग्लंडला त्याचा फायदाच झाला असता. दुसरी गोष्ट म्हणजे नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजी देण्याचा निर्णय हा आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा होता. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा हे पहिले चार फलंदाज डावाला कशाही पद्धतीने वेग देऊ शकण्याची ताकद बाळगून आहेत. यातील एक अपयशी ठरला, तर दुसरा खेळतो हे या स्पर्धेत दिसून आले. हा एक असा खेळतो की गोलंदाज पार थकून जातात. आव्हानाचा पाठलाग करण्याचे दडपण नसताना मुक्तपणे फलंदाजी करण्याचा आनंद भारताच्या प्रत्येक फलंदाजाने आज घेतला. फलंदाजीला पोषक अशा खेळपट्टीवर आणखी काय हवे होते. इंग्लंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजीला रोखण्याचे आव्हान पेलू शकले नाहीत. त्यांना क्षेत्ररक्षणाची देखिल साथ मिळाली नाही.
भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत आपल्या चाहत्यांना समाधान दिले आहे. आज भारतीय संघ या लघुत्तम आणि अतिवेगवान, आक्रमक क्रिकेटमध्ये आढळपदावर आहे हे मी अजूनही सांगेन. पहिल्या क्रमांकापासून अकराव्या खेळाडूपर्यंत सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. अर्शदीप, शिवमने टाकलेले वाईड चेंडू विसरुन जा. फलंदाजाला मोहात पाडण्याचा तो एक भाग असतो. यात जॅक्स कसा अडकला हे सर्वांनी पाहिले. भारतीय संघ अंतिम फेरीत जाणार यात शंकाच नव्हती. पण, त्यांचा खेळ त्या लौकिकाला साजेसा होत नाहीये. अजूनही काही उणिवा आहेत. भारतीय फलंदाजी अजून पूर्ण ताकदीने वर्चस्वाने होत नाहीये. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चुकांचा फायदा ते उठवत आहेत. पण, जे आरपार वर्चस्व अपेक्षित होते तेवढे ते दिसून येत नाही. अंतिम सामना सोपा नाही. विजेतेपद राखण्याचे दडपण भारतावर असणार आहे. अर्थात, दडपणाखाली खेळणे आजच्या युवा पिढीला चांगले जमते. न्यूजीलंडकडे गमाविण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे अशा परस्परविरोधी मानसिकतेत अंतिम सामना रंगणार आहे.


