Sanjay Raut on Eknath Shinde : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत मोठा स्फोट झाला आहे. राज्यातील १४ महापालिकांमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभी राहिली आहे. “निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली,” असा थेट हल्ला करत शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी भाजप, शिंदे आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. “शिंदे सेनेकडून उमेदवारीसाठी १० कोटी, तर राष्ट्रवादीकडून ५ कोटींची रीघ लागली आहे. गुंडांची रीघ पैशासाठी आहे,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
राऊत म्हणाले, “नाशिकपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत गोंधळ झाला. भाजपने महिलांपासून तरुणींना तिकीट देण्यात गोंधळ घातला. बाहेरून आलेल्या उमेदवारांना, गुंडांना उमेदवारी दिली. गजा मारणे यांच्या पत्नीलाही तिकीट मिळाले. निष्ठावंतांची किंमत नाही, पैशाचा पाऊस पडतोय. भाजप, शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष ५-१० कोटींचे पॅकेज देत आहेत, त्यासाठी हा गोंधळ आहे.”
राऊत पुढे म्हणाले, “शिवसेनेत याद्या जाहीर होत नाहीत. उद्या कळेल कुणाला काय दिले. काल संध्याकाळी आमच्या उमेदवारांनी अर्ज भरले. मनसेनेही अर्ज भरले. काही ठिकाणी आम्ही एकत्र आहोत. पण महायुतीत एकमेकांच्या छाताडावर बसले आहेत. गुंडांची रीघ पैशासाठी आहे.”
बंडखोरांवरही राऊतांनी ताशेरे ओढले. “बंडखोरी म्हणजे काय? तिकीट न मिळाल्यावर दुसऱ्या पक्षात जाणे हे बंड नाही, बेईमानी आहे. या देशात फक्त १८५७ ची इंग्रजांविरुद्धची क्रांती खरी बंडखोरी होती. निष्ठा पक्षावर की तिकीटावर? ज्यांची तिकीटावर निष्ठा, ते गेले. हे लोक १० दिवसांपासून संपर्कात होते. त्यांना बंडखोर नव्हे, बेईमान म्हणावे.”
या टीकेमुळे महायुतीत खळबळ उडाली आहे. १५ जानेवारीला मतदान असून, महायुतीतील फूट आणि पैशांच्या आरोपांमुळे ठाकरे सेना-काँग्रेस-मनसे युतीला फायदा होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात राऊतांच्या या हल्ल्याची जोरदार चर्चा आहे.


