Pune Crime: महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असतानाच, पुणे पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीचा मोठा कट उधळून लावला आहे. वाघोली-केसनंद रस्त्यावर मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान एका टेम्पोची झडती घेतली असता, तब्बल १६ लाख ७४ हजार ८४५ रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभने दाखवणाऱ्या गटांचे धाबे दणाणले आहेत.
गस्ती दरम्यान टेम्पो अडवला अन्…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या ‘परिमंडळ ४’ (शाखा ७) कडून शहरात कडक गस्त घातली जात आहे. वाघोली परिसरात संशयास्पदरीत्या येणारा एक टेम्पो पोलिसांनी अडवला. सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र अधिक चौकशी केली असता गाडीत विदेशी दारूच्या ७,००० बाटल्या असल्याचे उघड झाले.
परवाना नाही, कागदपत्रे गायब
पोलिसांनी टेम्पो चालक दिगंबर शाहू (वय २५, रा. मुखेड, नांदेड) याला ताब्यात घेतले आहे. दारूच्या वाहतुकीबाबत विचारणा केली असता, चालकाकडे कोणताही अधिकृत परवाना किंवा कागदपत्रे आढळली नाहीत. पोलिसांनी दारूच्या साठ्यासह टेम्पो देखील जप्त केला असून, एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २३ लाख रुपयांच्या घरात आहे.
मोठं रॅकेट असण्याची शक्यता
निवडणुकीत मतदारांना खुश करण्यासाठी हा साठा शहरात आणला जात होता का? ही दारू नक्की कोणासाठी आणि कुठून पाठवण्यात आली होती? या प्रश्नांचा शोध आता पोलीस घेत आहेत. यामागे एखादे मोठे अवैध दारू माफियांचे रॅकेट सक्रिय असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांचा इशारा
निवडणुकीच्या काळात छुप्या मार्गाने होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पुण्यात सर्वच चेक-पोस्टवर कडक तपासणी केली जात आहे. पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.


