Sunetra Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय आणि प्रशासकीय पोकळी भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश आज जारी केले.
अर्थ खाते वगळता सर्व अधिकार बहाल
अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. अजित पवारांकडे असलेले बहुतांश विभाग आता सुनेत्रा पवार हाताळतील. मात्र, महत्त्वाचे असलेले ‘अर्थ आणि नियोजन’ खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखण्यासाठी आणि बीडमधील राजकीय समीकरणे हाताळण्यासाठी सुनेत्रा पवारांकडे या जिल्ह्यांचे पालकत्व देणे सरकारसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.
‘राज्याच्या हितासाठी घेतला शपथविधी’
अजितदादांच्या निधनानंतर केवळ चारच दिवसांत सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्याने विरोधकांकडून काही प्रमाणात टीका झाली होती. यावर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, “पवार कुटुंबाने तिसऱ्या दिवशी सर्व धार्मिक विधी पूर्ण केले होते. राज्याचे काम थांबू नये आणि कार्यकर्त्यांना आधार मिळावा, याच उदात्त हेतूने सुनेत्रावहिनींनी ही जबाबदारी तातडीने स्वीकारली आहे.”
९ फेब्रुवारीपासून मंत्रालयातून कारभार
मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार येत्या ९ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील आपल्या कार्यालयात अधिकृतपणे पदभार स्वीकारतील. बारामती आणि बीडमधील जनतेने अजितदादांना दिलेल्या भावपूर्ण श्रद्धांजलीची दखल घेत, त्यांच्या विकासाची कामे पुढे नेण्यास त्या कटिबद्ध आहेत.


