Drunk and Drive: पुणे शहरातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात कठोर पाऊले उचलली आहेत. यापुढे केवळ दंड भरून मद्यपी चालकांची सुटका होणार नाही, तर वारंवार नियम मोडल्यास त्यांची गाडी कायमची जप्त केली जाणार असून, त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर (Social Media) व्हायरल केली जाणार आहेत.
तिसऱ्यांदा चूक केल्यास थेट ‘जप्ती’
शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा शिबिरात बोलताना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मद्यपी चालकांना थेट इशारा दिला आहे. एखाद्या चालकावर दोनदा ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई झाली असेल आणि त्याने तिसऱ्यांदा तीच चूक केली, तर त्याचे वाहन पोलिसांकडून जप्त केले जाईल. नियम मोडणाऱ्यांचे फोटो पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जातील. इतकेच नाही, तर हे फोटो संबंधित व्यक्तीच्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबीयांनाही पाठवण्यात येणार आहेत.
‘पोलिसी शैलीत’ होणार सत्कार
पोलिस आयुक्तांनी आपल्या भाषणात कडक शब्दांत सुनावले की, मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांचा भर चौकात पोलिसांच्या खास शैलीत ‘सत्कार’ केला जाईल. मद्यपी चालकांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे निष्पाप पादचारी आणि इतर वाहनचालकांचे जीव जातात, संपूर्ण कुटुंबे उद्ध्वस्त होतात. ही गुन्हेगारी वृत्ती मोडीत काढण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
दर आठवड्याला भरणार ‘समुपदेशन शिबीर’
शिवाजीनगर येथील शिबिरात सुमारे १००० मद्यपी चालकांना बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आता दर आठवड्याला अशा स्वरूपाची शिबिरे घेऊन नियम मोडणाऱ्यांचे समुपदेशन केले जाईल.


