Pune Metro : पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जून महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईनंतर पुण्यातही मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत असून आयटी कर्मचाऱ्यांसह हजारो प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मेट्रोची सुरक्षा तपासणी सुरू असून आवश्यक मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सर्व सुरक्षा परवानग्या मिळाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो सेवा सुरू केली जाऊ शकते.
पहिल्या टप्प्यात १२ स्थानके
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात मान ते बालेवाडी दरम्यान १२ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या मार्गामुळे हिंजवडी आयटी पार्क, बालेवाडी आणि आसपासच्या भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हिंजवडी ते शिवाजीनगर या संपूर्ण मार्गावरील चाचणी फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र शिवाजीनगर परिसरातील उर्वरित ११ स्थानकांचे काम अद्याप सुरू आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे या कामात विलंब होत असून ही स्थानके ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच बालेवाडी, बाणेर आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवास अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे.


