Pune Crime: पुणे शहरात सासू-सुनेच्या वादातून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात घरगुती वादाचे रूपांतर हिंसक वळणात झाले आणि एका ६० वर्षीय सुनेने आपल्या ८० वर्षीय सासूवर चाकूने सपासप वार करत त्यांची जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण पसरले आहे.
बेडरुममध्ये कोंडले आणि केला हल्ला
ही धक्कादायक घटना १२ मे रोजी दुपारी १:३० ते २:३० च्या दरम्यान ‘समृद्धी रेसिडेन्सी’ येथे घडली. सुमन शिंदे (वय ८०) आणि आरोपी सून अनुपमा शिंदे (वय ६०) यांच्यात नेहमीप्रमाणे घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात अनुपमा यांनी घरातील दुसऱ्या सुनेला बेडरुममध्ये ढकलून बाहेरून कडी लावली, जेणेकरून कोणीही आडवे येऊ नये. त्यानंतर स्वयंपाकघरातील धारदार चाकूने त्यांनी वृद्ध सासूवर हल्ला चढवला.
रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू
आरोपी सुनेने सुमन शिंदे यांच्या गळ्यावर आणि हातावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, सुमन शिंदे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
पोलीस कारवाई आणि तपास
भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी सून अनुपमा शिंदे हिला ताब्यात घेतले असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादामागील नेमके कारण काय होते आणि ही टोकाची भूमिका का घेतली गेली, याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.


