मुंबई: बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहणाऱ्या एका खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले आहे. तसेच संबंधित खाजगी कंपनीला पाच हजार रुपये दंड देखील ठोठावला आहे. एसटी महामंडळाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केली.
दादर येथून स्वारगेटकडे निघालेल्या खासगी ई-शिवनेरी बसमधील चालक 22 मार्च रोजी रात्री लोणावळ्याजवळ बस चालवत क्रिकेट मॅच बघत होता. याचे व्हिडिओ शूटिंग संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खासगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहन चालवल्याप्रकरणी बडतर्फ केले आहे. तसेच सदर खाजगी संस्थेला 5000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
यावेळी बोलताना परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावर धावणारी एक प्रतिष्ठित बस सेवा आहे. या ई-शिवनेरी बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती देखील प्रवास करीत असतात. तसेच अपघातविरहित सेवा म्हणून या बस सेवेकडे पाहिले जाते. त्यामुळे बेशिस्त पद्धतीने वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास आणखी दृढ होण्यास मदत होईल, असंही सरनाईक म्हणाले.


