Maharashtra Rain Alert : राज्यात अखेर मान्सूनने वेग पकडला असून पावसाची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबई, उपनगरांसह पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा घाटमाथा आणि सातारा परिसरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील उर्वरित बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मान्सूनने पालघर ते वर्धा या पट्ट्यापर्यंत प्रगती केली असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा मोठा भाग व्यापला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील उर्वरित भागांसह गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांतही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबईत पहिल्याच दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे.
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेलाही पावसाचा फटका बसला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल-ठाणे लोकल सेवा रुळांवर पाणी साचल्यामुळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली. हार्बर मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेवांवरही विलंबाचा परिणाम दिसून येत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.


