Pune Accident : पुण्यातील हडपसर परिसरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात २७ वर्षीय नेहा उपाध्ये यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांचे पती सुमीत उपाध्ये जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा उपाध्ये आणि त्यांचे पती सुमीत हे शनिवारी दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीचा तोल जाऊन दोघेही रस्त्यावर कोसळले.
या अपघातात नेहा उपाध्ये टँकरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर सुमीत उपाध्ये जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. हडपसर पोलिसांनी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या अपघातामुळे नव्या संसाराची सुरुवातच अशा दु:खद शेवटाने झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.


