Maharashtra IPS Transfer : राज्य शासनाच्या गृह विभागाने महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, काही अधिकाऱ्यांच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द करून त्यांना पूर्वीच्या पदावरच कायम ठेवण्यात आले आहे.
गृह विभागाच्या आदेशानुसार, पोलीस महासंचालक कार्यालयाच्या शिफारशी, कायदा-सुव्यवस्था, प्रशासकीय गरज आणि न्यायालयीन निर्देश लक्षात घेऊन या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलामुळे दहशतवाद विरोधी पथक (ATS), राज्य राखीव पोलीस बल (SRPF), महामार्ग सुरक्षा, रेल्वे पोलीस आणि महानगरातील पोलीस प्रशासनाला नवे नेतृत्व मिळाले आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
- अरविंद चावरिया यांची पोलीस उपमहानिरीक्षक, SRPF मुंबई म्हणून नियुक्ती
- विनिता साहू यांची नागपूर येथे अपर पोलीस आयुक्तपदी बदली
- अरविंद साळवे यांच्याकडे ATS मुंबईचे पोलीस उपमहानिरीक्षक पद
- श्रीकांत परोपकारी यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती
- श्रीकृष्ण कोकाटे यांची ACB नांदेड येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती
- रुपाली आंबुरे यांची डायल-112, नवी मुंबई येथे बदली
- संदीप पालवे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी
- स्वाती भोर यांची तासगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी नियुक्ती
- कविता नेरकर यांची SRPF गट क्र. १४, छत्रपती संभाजीनगर येथे समादेशक म्हणून बदली
- वैशाली माने यांची मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती
काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द
दरम्यान, अमरसिंह जाधव, अमोल झेंडे आणि निलेश सोनावणे यांच्या २१ मे रोजी झालेल्या बदल्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना त्यांच्या विद्यमान किंवा नव्या सुधारित पदांवर कायम ठेवण्यात आले आहे.
राज्यातील पोलीस प्रशासनात झालेल्या या मोठ्या फेरबदलामुळे आगामी काळातील कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेवर महत्त्वाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


