Congress Politics : कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पुढील दोन दिवसांत राजीनामा देऊ शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाच्या बैठकीनंतर या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस सरकार स्थापन होताना मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळायचे, तर त्यानंतर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे नेतृत्व सोपवले जाणार होते. आता अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आल्याने नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.
दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, के.सी. वेणुगोपाल, सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार उपस्थित होते. अधिकृतरीत्या ही बैठक राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवारांबाबत असल्याचे सांगण्यात आले असले, तरी नेतृत्वबदलावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
दरम्यान, ७७ वर्षीय सिद्धरामय्या यांनी नेतृत्वबदलाच्या चर्चा फेटाळून लावत या केवळ अफवा आहेत” असे स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेसमधील काही गटांकडून ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सत्ता हस्तांतरण व्हावे, यासाठी दबाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांना राज्यसभेवर पाठवून दिल्लीतील संघटनात्मक राजकारणात महत्त्वाची जबाबदारी देण्याचा पर्याय काँग्रेस नेतृत्वाकडून विचाराधीन आहे. दुसरीकडे, त्यांच्या समर्थकांनी मात्र विधानसभा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांनीच मुख्यमंत्री राहावे, अशी भूमिका घेतल्याने काँग्रेससमोरील पेच अधिकच वाढला आहे.


