Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सोमवारी तब्बल ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सलग काही दिवस ४७ अंशांच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भात आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागपुरात सर्वाधिक २५, अमरावतीत ९, यवतमाळमध्ये ८, अकोल्यात ४, वर्ध्यात ४, तर गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये प्रत्येकी १ मृत्यूची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये बेघर नागरिकांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
उष्णतेचा फटका केवळ माणसांनाच नव्हे तर पशुपक्ष्यांनाही बसत आहे. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यात पाण्याअभावी ५०० हून अधिक वटवाघळांचा मृत्यू झाला, तर अकोल्यात वन्यप्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.
तज्ज्ञांच्या मते, २५ मे ते २ जून हा काळ ‘नवताप’चा असल्याने सूर्याची दाहकता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


