NCP Working Committee: राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली असून, पक्षाच्या गोटात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडलेली प्रमुख नेत्यांची बैठक कमालीची वादळी ठरली. या बैठकीत ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी आपली तीव्र नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरून पक्षात वादाची ठिणगी पडली होती, त्यात आता थेट बदल करण्याचा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतला आहे. या वादळी बैठकीत अनेक नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाले. बैठकीला प्रफुल पटेल यांनी अनुपस्थिती दर्शवली, तर सुनील तटकरे आपले मत मांडण्यासाठी उभे राहण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून अचानक बाहेर पडले. त्यातच बैठकीदरम्यान सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. याशिवाय, आगामी १० जून रोजी होणारा पक्षाचा स्थापना दिन मेळावा पुण्यात घ्यायचा की मुंबईत, यावरूनही नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप अर्थ खाते पुन्हा न मिळाल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी बैठकीत जाहीर खंत व्यक्त केली.
नाराजी नाट्यानंतर नवी कार्यकारिणी निवडणूक आयोगाकडे पाठवणार
या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक नवीन आणि सुधारित यादी लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवणार असल्याचे सूत्रांकडून समजते. यापूर्वी पाठवण्यात आलेल्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांसोबत त्यांच्या पदांचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पटेल आणि तटकरे गट प्रचंड नाराज झाला होता, तसेच या दिग्गज नेत्यांना बाजूला सारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. हाच वाढता वाद मिटवण्यासाठी आता नव्या यादीच्या हालचालींना वेग आला आहे.
हसन मुश्रीफ यांना संधी, दोन नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता
नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सुधारित कार्यकारिणीत मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांच्याऐवजी आता हसन मुश्रीफ यांना नवीन कार्यकारिणीत मानाचे स्थान दिले जाऊ शकते. दुसरीकडे, अंतर्गत समतोल साधण्यासाठी सुबोध मोहिते आणि प्रजापती या दोन नेत्यांना नव्या कार्यकारिणीतून डच्चू दिला जाण्याचे संकेत मिळत आहेत. या संभाव्य फेरबदलांमुळे आणि ‘देवगिरी’वरील वादळानंतर आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत वादावर कसा पडदा टाकते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


