Ashok Kharat Marathi Movie: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आता लवकरच एक मराठी चित्रपट निर्माण होणार आहे. अनेक महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपाखाली सध्या खरात गजाआड आहे. या प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या अनेक आक्षेपार्ह व्हिडिओजमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं नावही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं. आता याच संपूर्ण प्रकरणाचा काळा चेहरा रुपेरी पडद्यावर उलगडणार असून, या चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका शिवसेना नेत्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा आगामी चित्रपट केवळ अशोक खरातच्या ढोंगीपणावर आधारित नसेल, तर या प्रकरणाच्या आडून चालणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणातील बड्या व्यक्तींच्या साठमारीवर आणि सामाजिक वास्तवावरही थेट प्रकाश टाकणारा असेल.
दीपाली सय्यद यांचा महत्त्वपूर्ण खुलासा आणि भूमिकेबाबतचा सस्पेन्स
‘बिग बॉस ६’ मधून बाहेर पडल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी या चित्रपट निर्मितीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अशोक खरातच्या प्रकरणाविषयी मला ‘बिग बॉस’मधून आल्यावर समजले असून या भोंदू बाबाने संपूर्ण राज्याला हादरवले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणावर आधारित येत असलेल्या चित्रपटाची मी स्वतः निर्मिती करत नसले, तरी एक कलाकार म्हणून मी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे, असा खुलासा त्यांनी केला. मात्र, या चित्रपटात त्या रुपाली चाकणकर यांचीच भूमिका साकारणार का? या प्रश्नावर दीपाली सय्यद यांनी थेट उत्तर देणे टाळत सस्पेन्स कायम ठेवला आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट सध्या आपल्याकडे आली असून ती वाचत असल्याचे सांगत, भूमिका कोणती आहे हे आत्ताच सांगण्यात मजा नाही, ती प्रेक्षकांनी पडद्यावरच पाहावी असे त्या म्हणाल्या. ही स्क्रिप्ट आवडल्यानंतर सर्व गोष्टी निश्चित होतील आणि पुढील महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, समाजात अशा अनेक प्रवृत्ती लपलेल्या असू शकतात, त्यामुळे कोणत्याही बाबाकडे जाताना प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
चाकणकरांवरील आरोपांवर दीपाली सय्यद यांनी मांडले स्पष्ट मत
अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी आणि सोशल मीडियावरून रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. या वादावर बोलताना दीपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांची पाठराखणवजा भूमिका घेतली आहे. राजकारणात असणाऱ्या व्यक्तींवर आरोप-प्रत्यारोप होणे ही काही नवीन गोष्ट नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा नेमका काय संबंध होता की वस्तुस्थिती काही वेगळीच होती, हे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यावरच स्पष्ट होईल, असे सांगत त्यांनी या प्रकरणाची खरी बाजू चित्रपटातून समोर येईल असे संकेत दिले आहेत.


