पुणे : कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह सेवा रस्त्यावर असलेल्या नाल्याजवळ टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ३०) उघडकीस आला आहे. खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. प्रीती सचिन वखारे (वय ३१, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
आंबेगाव बुद्रुक परिसरातील धबाडीमधील नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेची ओळख पटलेली नव्हती. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली. पोलिसांनी तपास करून ओळख पटविली. मृतावस्थेत सापडलेली महिला कात्रजमधील खोपडेनगर भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. शवविच्छेदन अहवालात वखारे हिच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


