नवी दिल्ली: आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरीस देशातील रिअल इस्टेट क्षेत्राला बँकांनी दिलेले एकूण कर्ज ३५.४ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. गेल्या चार वर्षांत त्यात जवळपास दुप्पट वाढ झाली असल्याचे रिअल इस्टेट सल्लागार संस्था कॉलियर्स इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. ही आकडेवारी देशातील अव्वल ५० नोंदणीकृत रिअल इस्टेट कंपन्यांच्या आर्थिक विवरणांच्या विश्लेषणावर आधारित आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण १०९.५ लाख कोटी रुपये असलेले बँक कर्ज २०२४-२५ मध्ये वाढून १८२.४ लाख कोटी रुपये झाले. याच कालावधीत रिअल इस्टेट क्षेत्राला बँक कर्ज १७.८ लाख कोटी रुपयांवरून ३५.४ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. महामारीनंतरच्या काळात भारताचे रिअल इस्टेट क्षेत्र आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे आणि इतर प्रमुख उद्योगांपेक्षा चांगले प्रदर्शन करत आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीचा हवाला देत कॉलियर्स इंडियाने म्हटले आहे.
अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये केवळ २३ टक्के आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांचा नफा जास्त होता, तर आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरीस हा आकडा ६२ टक्क्यांपर्यंत वाढला. यासोबतच, ६० टक्क्यांहून अधिक कंपन्यांचे कर्ज आणि समभाग गुणोत्तर ०.५ च्या खाली होते, जे आर्थिकदृष्ट्या निरोगी स्थिती दर्शवते.


