नवी दिल्ली: पाकिस्तान पुरस्कृत कुख्यात प्रतिबंधित ‘लष्कर -ए-तोयबा’चा छुपा समूह ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ने (टीआरएफ) जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे हल्ला घडवला, असा ठपका संयुक्त राष्ट्रातील एका अहवालात ठेवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात टीआरएफचा उल्लेख झाल्याने पाकिस्तानचा खोटारडेपणा व बनावट चेहरा पुन्हा एकदा जगजाहीर झाला. तसेच भारताची कूटनीती यशस्वी होण्यासह भारताच्या आरोपांना दुजोरा मिळाला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) पहिल्यांदाच आपल्या अहवालात पहलगाम हल्ल्यात लष्कर -ए-तोयबाची उप शाखा असलेल्या ‘टीआरएफ’चा हात असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे पाक पुरस्कृत सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताची स्थिती भक्कम होण्याची अपेक्षा आहे. जम्मू-काश्मिरात २२ एप्रिल रोजीचा हल्ला हा लष्कर -ए-तोयबाच्या पाठिंब्याशिवाय होणे शक्यच नाही. कारण टीआरएफ व लश्कर यांच्यात लागेबांधे आहेत, असे सुरक्षा परिषदेच्या निगरानी दलाने आपल्या अहवालात एका सदस्य देशाच्या हवाल्याने म्हटले आहे.
परंतु या अहवालात त्या सदस्य देशाच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या प्रकरणाची माहिती असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या संसदेत पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिलेल्या निवेदनात टीआरएफचा उल्लेख हटवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले. पहलगाम हल्ला ५ अतिरेक्यांनी घडवला आहे. टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली व त्याच दिवशी घटनास्थळाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. या हल्ल्यानंतर प्रादेशिक स्थिती अजूनही नाजूक झालेली आहे. दहशतवादी संघटना या प्रादेशिक तणावाचा फायदा उचलू शकतात, अशी भीतीसुद्धा प्रस्तुत अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, पाकिस्तान दहशतवादी हल्ल्यांमागे स्वतःचा हात असल्याचे आरोप फेटाळत आहे. पाकची ही रणनीती आता अपयशी ठरली. कारण ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ आणि ‘पीपल्स अगेंस्ट फासिस्ट फ्रंट ‘सारख्या धर्मनिरपेक्ष वाटणाऱ्या व आधुनिक नावांचा वापर पाकमध्ये सुरूच आहे. लष्कर -ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या जिहादी संघटनांवरून लक्ष विचलित करणे व जम्मू-काश्मिरात आपल्या दहशतवादी अभियानाला पाकिस्तान स्वदेशी रूप देऊ इच्छित आहे, असेही सुरक्षा परिषदेच्या अहवालात ठळकपणे नमूद आहे.


