लेह : पूर्व लडाखच्या दूर्गम भागात लष्कराच्या एका वाहनावर मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. यात दुर्दैवाने लेफ्टनंट कर्नलसह दोघांचा मृत्यू झाला. याशिवाय मेजर रँकचे दोन अधिकारी व एक कॅप्टन गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पूर्व लडाख भागातून लष्कराचा ताफा जात होता. याच दरम्यान लेहपासून सुमारे २०० किमी दूर गलवा खोऱ्यात दुरबूकजवळ चारबाग येथे सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ताफ्यातील वाहनावर मोठी दरड कोसळली. यात दुर्दैवाने दोन सैन्य अधिकाऱ्यांना प्राण गमवावा लागला. लेफ्टनंट कर्नल भानुप्रताप सिंह मनकोटिया आणि लान्स दफादार दलजीत सिंह (१४ सिंध हॉर्स) अशी वीरमरण आलेल्या जवानांची नावे आहेत. याशिवाय मेजर मयंक शुभम (१४ सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (६० आर्मड) हे तिघे जण गंभीररीत्या जखमी झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.


